mummas

पालकत्व .. साधं सोपं अन तितकंच वळणावळणाचं!

- Marathi - March 10, 2019
31 views 47 secs 0 Comments

.. ही आमची ऋचा म्हणजे “श्रीराम” अन ही छोटी मुक्ता म्हणजे “श्रीकृष्ण”! अशीच होते ओळख आमच्या कन्यारत्नांशी! खरं सांगायचं तर या पऱ्यांनी आमचं अख्ख जग व्यापून टाकलंय! तारे जमीन पर या चित्रपटातील “Every Child Is Special” या वाक्याचा अर्थ आम्हा दोघांना पदोपदी कळत असतो!

दोघी पोरींच्या वयात ४ वर्षाचं अंतर पण प्रश्नात मात्र अगदी प्रकाश वर्षांचं अंतर असू शकतं! “काल माझ्या स्वप्नात कृष्ण आला होता, हो ना ग आई?” या बाळबोध प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत “बाबा, तुम्ही नक्की केबिन मध्ये बसून करता काय?” या लॉजिकल प्रश्नाचा मारा होत असतो.
एक एकपाठी तर दुसरी तिला हवं तेव्हाच अभ्यास करणार पण मग नेटाने! एक “शाळेत फार अभ्यास करते ” असं शिक्षक सांगणार अन दुसरी “अहो ही 1 to 50 नाही लिहीत” असं म्हटल्यावर घरी येऊन 1 to 100 सहज लिहून “मॅडम ला कसं फसवल” म्हणून डोळे मिचकवणार! एक अंधारात जायला घाबरणार अन दुसरी मुद्दाम अंधारात पुढे जाऊन लपून बसून ताईला घाबरवणार! दोघी वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या!

मग अशावेळी पालक म्हणून आमची जबाबदारी असते दोघींचं हे “वेगळेपण” जपण्याची ! सुरवातीला हे कठीण गेलं . कारण आपण सगळेच छोटीला मोठीसारखी बनवू पाहतो अन मग आपणच सुरू करून देतो एक जीवघेणी शर्यत अन मग पोरं बिचारी धावत राहतात या शर्यतीत! हे लक्षात आल्यावर ठरवलं की नाही, आपण या दोघींना unique असण्याचं स्वातंत्र्य द्यायलाच हवे नव्हे तो त्यांचा अधिकारच आहे कि !

…. “मग बाबांनी नाही का घेतलं लोणचं मग मी का नाही घ्यायचं?” ऋचाच्या सहज सोप्या प्रश्नानी मी हादरलो होतो. त्यांची आई, मोना, हसत होती अन लक्षात आलं की मला काय करायला हवं ते! मी लोणच्याची बरणी कचऱ्यात टाकली अन म्हटलं “आजपासून लोणचं बंद”. थोड्या वेळानी ऋचाने आणि मुक्ताने लीप बाम कचऱ्यात फेकला म्हटतात कश्या “आजपासून लीप स्टिक बंद” .. हसू आलं पण लक्षातही आलं की आपल्या पोरांचे आपणच खरे हिरो आहोत. आपली पोरं काही वर्षांनी कशी वागतील हे आपण आपल्याला आरशात बघितल्यावर कळून जातं! हे कळल्यावर पुढचा प्रवास सोपा होतो!

एक दिवस अचानक ऋचाची डायरी वाचण्यात आली. सगळं छान छान असताना अचानक एका तारखेला वाचलं “माझे आई बाबा कोणी तरी बदलून नेले आहेत, ते गप्पा मारायचे, खेळायचे.. मला भीती वाटतेय.. कोण आहेत हे?” .. काळजात चर्रर्र झालं! रात्रभर झोप नाही. मोनाशी बोललो अन उपाय सोप्पा होता.. दुसऱ्या दिवशी पासून आम्ही दोघंही पोंरींना खास वेळ देऊ लागलो, गप्पा, गोष्टी सगळं जोरदार.. पोरींचे सगळ्यात खास दोस्त .. मोठीच्या भाषेत BFF बनलो अन आम्हाला पोरी अन पोरींना खरे आई बाबा परत मिळाले!

ऋचा मुक्त भले १० आणि ६ वर्षाच्या आहेत, आम्ही त्यांना छोट्या छोट्या निर्णयात सामावून घ्यायला सुरुवात केली .. उद्याच्या मोठ्या निर्णयांची तयारी जणू! त्या लहान आणि आणि दोघे मोठे ही संकल्पनाच काढून टाकली (मात्र ओरडलं पाहिजे तिथे हक्क राखीव!) परंतु “आई / बाबा तुम्ही चुकताय” हे हक्काने सांगण्याची हिम्मत आणि किंमत त्यांना दिलीये आम्ही! अन चांगलं केलं की शाबासकी देण्याचा हक्कही ! त्यामुळे छोटीनी आम्हाला adopt केलं तेव्हा मोठी सगळं समजून घेऊन आमच्यासोबत उभी होती आणि आहे !
उद्याचं काही ठाऊक नाही कदाचित दोघी अभ्यासात पुढे जातील किंवा एक अभ्यासात तर एक खेळात किंवा कशातही ! पण हुशार असणं म्हणजे फक्त अभ्यासात हुशार ही संज्ञा आम्हा दोघांनाही अमान्य आहे! हुशारी ज्या क्षेत्रात असेल त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत. अखेर “पोरी अभ्यासात हुशार आहेत हो तुमच्या” हे इतरांकडून ऐकण्यापेक्षाही “तुमच्या पोरी कायम सुखी दिसतात हो” हे ऐकणं किंवा “आई बाबांनी आम्हाला सुखी राहायला शिकवलं, बाकी जगण्याच शिवधनुष्यं आम्ही सहज पेलून घेऊ” असं जेव्हा पोरी म्हणतील तेव्हा डोळ्यातील एक आनंदाश्रू फार फार मोलाचा असेल!
बरच लिहिता येईल पण थांबायला हवं.. धन्यवाद!

मोनाली पंचाक्षरी
योगेश पंचाक्षरी

 

Also Read About

https://shade.agency/stay-at-home-mother-comparison-hindi/

 

Join Our Mummas Community Now ! !

Being a Mom is not at all easy as everyone thinks. There are lot of expectations, decisions to take, work, challenges and what not. Mothers usually forget themselves while raising their kids.
But wait, you should not do this. You are a Mother and hence deserves everything whatever you wish. Join this Millennial Indians Moms group to connect with like-minded moms where moms help and support each other in every way.

TAGS: