mummas

बाबा!… मित्र .. सुपरहिरो.. की अजून कोणी?

- Languages - March 19, 2019
10 views 44 secs 0 Comments

“मी तर ठरवलंय की मोठी झाली की लग्नच नाही करायचं!” इति मोठी परी ऋचा!

“हो का ? मग मी पण नाही करणार! नाही नाही, मी तर बाबांशीच लग्न करेल!” मुक्ता चं ते भाबडं उत्तर ऐकून सगळं खरं खळखळून हसलं, अन मी मात्र काही वर्षांपूर्वीच्या एका प्रसंगात रमलो!

….झालं असं की क्लासशी संबंधित काही तरी मोठं काम मी पूर्ण केलं, म्हटलं जरा कौतुक ऐकू म्हणून बायकोला म्हटलं “बघ झालं ना काम बरोबर?” तर म्हणते कशी “योगेश खरच तू खूप हुश्शार आहेस, अगदी माझ्या बाबांसारखाच!’
“नुसता हुशार पण चाललं असतं की, बाबांसारखा कशाला?” मी जरा लटक्या रागानी विचारलं तर मोना म्हटली “योगेश लक्षात ठेव, प्रत्येक लेकीला ना आपला नवरा हा आपल्या बाबांसारखा असावा असं वाटत असतं!”

.. तेव्हा माहीत नाही पण आज मुक्ताच्या उत्तराने हे अगदी पटलं! एक बाबा म्हणून माझी जबाबदारी काय आहे हे कळायला हे उदाहरण पुरेसं होतं.
.. अन मोनाच्या शिस्तीतून अन नीटनेटकेपणातून तिचे बाबा खरच डोकावतातही!
…कायमच “आई_आई” करणाऱ्या पोरी अचानक बाबांच्या कश्या अन कधी होऊन जातात कळत पण नाही! आणि हा बाबा तरी काय! लग्नाआधी घड्याळाचे काटे विसरून दिवसभर क्रिकेट खेळणारा पोरगा लग्न झाल्यावर एव्हढ्या जबाबदाऱ्या असतात हे पाहून आधीच हबकलेला असतो अन त्यामुळे बाबा झाला की हा त्या पोरींपेक्षा लहान होऊन जातो.

पण मग असे प्रसंग त्याला थोडं विचारी बनवतात. मग आई आणि बायकोलाही सुधरवता न आलेला हा पोरगा अन नवरा त्याच्या पोरींमुळे सुधरु लागला. चक्क वस्तूही जागेवर ठेवू लागला. कारण त्याला आदर्श बाबा बनायचं आहे. पोरी त्याला न्याहळत असतात ना!

…. “ए चला ग बडबड बंद, झोपा पटापट नाही तर फटके देईन” असं न म्हणता एका रात्री पोरींना म्हटलं ” एक आयडिया करू या, ऋचाला वाटेल ते बोलायला स्पेशल ३ मिनिट अन मग मुक्ताला स्पेशल ३ मिनिट. बोला आता काय बोलायचं ते अन मग मात्र झोपायचं हं!” अन काय चमत्कार, दोघी रोज रात्रीच्या त्या ३ मिनिटात काय बोलायचं त्याचे प्लॅन करू लागल्या! हक्काची वेळच जणू!

… “बाबा खूप भीती वाटते आहे, आमच्या समोरच्या टीम मध्ये खूप भारी प्लेयर्स आहेत. हरणार का आम्ही ?” बास्केटबॉल स्पर्धेआधी ऋचाचा प्रश्न! मी सहजच म्हटलं , “ऋचा लक्षात ठेव, भुताच्या वाड्यात भूत नसतंच मुळी, ते असतं आपल्या मनात!”. सायंकाळी पोरगी मेडल घेऊन आली आणि म्हणते कशी “बाबा भूत पळालं, वाड्यातलं नाही.. मनातलं!” मला असं वाटत की असे प्रसंगच बाबा अन पोरीचं नातं घट्ट करत असतात. हे नातं असतं स्वच्छ, सुंदर, समुद्राचा तळही दाखवणाऱ्या नितळ पाण्यासारखं! अन म्हणूनच एका निबंधात ऋचाने “माझे बाबा जोकर आहेत” असं लिहिल्यावर मी खळखळून हसू शकलो!

… परवा पुढच्या निबंधात ऋचानी “माझे बाबा माझे सुपरहिरो असण्याची ५ कारणे” लिहिली आणि सध्या मी जे ५ गुण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे मनापासून!

… अन खरं सांगू का, हे बाबा सुपरहिरो वगैरे बनण्यात खरा हात या पोरींच्या भामट्या आईचा पण अहेच की जी स्वतःचं बरचसं क्रेडिट बाबांना देत असते. अन दुसरे म्हणजे या बाबांचे बाबा म्हणजे आजोबा ज्यांनी स्वतःच्या योग्य वागणुकीतून हा आजचा हा सुपरहिरो बाबा घडवला आहे.

… शेवटी महत्वाचं काय तर बाबाचं महत्व हे आई पेक्षा काही कमी नसतंच पण ते त्याला कमवावं लागतं, प्रेमाने, शांतपणे, स्पेशल वेळ काढून अन पोरींच्या आईला कॉपी करूनही! आणि हो सध्या मी माझ्या पोरींची छोटी बहीण “जिनी” पण आहे बरं का!

…”योगेश, शोध मग आता तुझ्यापोरींसाठी तुझ्यासारखा नवरा!” मोनाच्या खडूस शब्दांनी जागा झालो!

…चला आता काय पळतो, रात्री चे ९ वाजलेत, पोरींचे स्पेशल गप्पांचे ३-३ मिनिट सुरू होतील. हा खास अनुभव मी चुकवू शकत नाही.
भेटूया पुन्हा!

image source

 

Also Read About

https://shade.agency/fathers-day-special-importance-of-a-father-in-a-childs-life/

 

Join Our Mummas Community Now ! !

Being a Mom is not at all easy as everyone thinks. There are lot of expectations, decisions to take, work, challenges and what not. Mothers usually forget themselves while raising their kids.
But wait, you should not do this. You are a Mother and hence deserves everything whatever you wish. Join this Millennial Indians Moms group to connect with like-minded moms where moms help and support each other in every way.

TAGS:
0 Comments
Leave a Reply